पेईंग गेस्ट - शेवट #३

पेईंग गेस्ट – शेवट

चोरी झाल्यानंतर मी विले-पार्ले मधील घर सोडले. आता माझा प्रवास सुरु झाला तो बोरिवलीच्या गोराई भागातून. ह्या भागाशी माझ अत्यंत जवळच नात जोडलं गेल होत. ते म्हणजे ओमकार आणि जयती  मुळे. ही दोन पात्र म्हणजे माझ्या आयुष्यातील एक सुंदर आणि निरागस भाग  (निरागस हे मैत्रीला म्हटल आहे..या दोन पात्रांना नाही ). खर तर या दोघांनी मी मुंबई मध्ये असताना माझ्या घराची आठवण कधीच येऊ दिली नाही.कधीही केव्हाही हाक मारा शिव्या घालून का असेना नेहमी हजर. तर मी पार्ल्यातील घर सोडताना वाइट वाटलं पण गोराईत राहायला जाणार याचा भलताच आनंद होता.  नेहमीप्रमाणेच खूप घरं शोधल्यानंतर एक घर मिळालं. भाड मला परवडेल असचं. त्या घरात एक आजी राहायच्या. एकट्याच होत्या. आता आजी आणि मी म्हणजे आमचं पटणं खर तर दिव्यच होत पण दुसरा पर्याय नव्हता. शेवटी मी त्या घरात शिफ्ट झाले. २बीएचके घर. आणि त्या २बिएचके घरात तुपाचा दरवळणारा सुगंध....कारण ते घर गुजराती कुटुंबाचं होत. आईशप्पथ सांगते तो वास डोक्यात जायचा (आताही लिहिताना तो वास नाकात दरवळलाचं) . त्यात आजीबाई खडूस...माझं सहसा म्हाताऱ्या बायकांशी पटत नाही. हे एक कारण होतच पण दुसर एक कारण म्हणजे ती आम्हाला राहायला मिळालेली खोली अत्यंत लहान होती आणि त्यात कसेबसे ३ बेड बसवलेले. जीवावरच आलं होत तिथे राहायचं पण तिथेही मला एक छान मैत्रीण मिळाली जान्हवी. मुळची गुजरातची लहान होती. नुकतीच १२ वी  पास होऊन सीए करण्यासाठी मुंबईमध्ये आली होती स्वभाव एकदम मस्त कलंदर होता. आल्या आल्या तिने मला दिलेली टीप म्हणजे.. “ दीदी भाग जाओ नाही तो ये बुढीया पागल कर देगी...” आधी हे वाक्य हसण्यावारी नेलं पण नंतर मात्र या वाक्याची प्रचिती आली. पण ठरवल्याप्रमाणे मी जास्त विचार केला नाही. कारण मी या आधीही म्हटल कि मुंबई सारख्या शहरात आधार नेसलेली अनेक माणसं आहेत त्यातलीच एक ही “बा”(गुजरातीमध्ये आजी ला “बा” असं म्हणतात). वय वर्ष ८० च्या आसपास , पांढरे केस,शरीर थकलेलं, अपघाताने एक पाय अधू झालेला आणि पती-मुलांचा अकाली मृत्यू या सगळ्यातून स्वतःला सावरून तग धरून असलेली बा. ही बा मला काही दिवसांनी समजली आणि मीही तिच्या कलांनी घेऊ लागले. तिच्यामध्ये मी माझ्या आजीला शोधू लागले आणि खरच मला माझी आजी सापडली हा एवढ असून पण आमच्यात वादावादी व्हायचीच . त्यामुळे आलेला दिवस ढकलत होते. अशातच काही नाती सांभाळत होते , काही नाती सोडून देत होते आणि काही नव्याने जोडण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात मात्र एक गोष्ट जी घडू नये ती घडली ते म्हणजे ‘नैराश्य’ Depression .

आजकाल नैराश्य या विषयावरून अनेक चर्चा झालेल्या पाहायला मिळतात. नैराश्य म्हणजे काय ते मी केवळ ऐकून होते पण जायफळ टाकलेले दुध पिऊन देखील झोप येईना झाली आणि झोप लागली तेव्हा तब्बल अठरा अठरा तास झोपून काढले तेव्हा मला खर नैराश्य काय असत हे समजलं. कोणाशी बोलायची इच्छा नाही, रडत बसायचं, शांत बसायचं आणि हे सगळ का होतंय याचं उत्तर शोधताना अजून कुठेतरी हरवून जायचं हे सगळं माझ्यासाठी फार भयंकर होत. कोणाला नक्की काय सांगू आणि कसं सांगू हेही जेव्हा समजत नाही न तेव्हा एकटेपणा काय हे जाणवत. या सगळ्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर हळू हळू पडायला लागला होता याच काळात माझं वजन तब्बल १५ किलो ने वाढले. माझ्या नैराश्याविषयी आजही बोलताना मला नक्की कारण नाही सागता येत कि ते का आलं होत. पण एवढच सांगता येईल कि घडून गेलेल्या कोणत्यातरी गोष्टींचा सतत कुठेतरी प्रभाव पडून पडून त्या साठ्लेलेया गोष्टी योग्य वेळी कोणाशीही न बोलता आल्याने मी या अवस्थेतून गेले. या काळात मला आत्महत्येसारखे विचार देखील मनात आले. पण त्याचवेळी स्वतःला खूप सावरलं. कारण आत्महत्या करून हे प्रश्न सुटणारे नव्हते. कारण मला नेमक्या कोणत्या गोष्टींचा त्रास झाला हेच शेवटपर्यंत कळल नाही आणि शेवटी जेव्हा स्वतःला सांभाळत आले तेव्हा याची कारणं शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. कसाबसा नैराश्याचा काळ संपला.

तरीही माझ्या लाडक्या बा ची कटकट काही केल्या कमी होत नव्हती . पण आता तिची कटकट खूप गोड वाटू लागली होती. आमची गट्टी खूप छान जमली होती. मला माझ्या आवडीचं सगळं बनवून खायला घालायची. मला माझ्या आज्यांचे प्रेम जास्त मिळाले नाही पण त्याची कसर माझ्या ‘बा’ने भरून काढली होती. जयती आणि मी त्या घरात एकत्र राहण्यासाठी खूप नाटकं केली आहेत. एकदातर माझा चक्क पाय मोडला असं सांगून माझ्याच घरात मला लंगडायला या पोरीने भाग पाडलं होत. हेच आमचं निरागस नात जे बा ला वाटायचं. खर काय ते आम्हालाच माहित. पण त्या घराने मला जगायला शिकवलं. त्याच घरात मी माझं मास्टर्स पूर्ण केलं , त्याच घरात मी माझ्या चांगल्या मैत्रिणी जमवल्या ज्यांनी शेवटी मी मुंबई सोडणार म्हणून सेलिब्रेशन करायचं ठरवल मस्करीत सुरु झालेले सेलेब्रेशन अश्रूंमध्ये कधी बदललं समजलं नव्हत त्या दोघी म्हणजे मिताली वाजपेयी आणि मानसी पुजारा या दोघीही माझ्यासाठी बकुळीच्या फुलांसारख्या आहेत.

असं म्हणतात मुंबईत राहण्याची मजाच वेगळी असते तर ते अगदी खर आहे. कारण मुंबई खऱ्या अर्थाने जगायला शिकवते. तीन घरं बदलली पण त्या तिन्ही घरातून मी लढायला आणि जगायला शिकले. काही न काही आयुष्य जगण्याचे धडे गिरवूनच बाहेर पडले. पण मला इथेच थांबायचं नव्हत, पुढे अजून चालायचं होत पण थोडासा ब्रेक लागलाच घरच्यांच्या मर्जीनुसार पुन्हा चिपळूणवासी झाले.

......शेवटी मुंबई ती मुंबईच

 ....आले पुन्हा २ वर्षांनी त्याच ‘जोमात पेईंग गेस्ट’ म्हणून .......... 


 

Comments

Post a Comment