निशब्द ‘ती’ ....
निशब्द ‘ती’ ....
त्या दिवशी जेवण वाढत असताना परी अचानक स्वतःचे केस ओढू लागली, जोरजोरात किंचाळून रडू लागली , जमेल तितक्या ताकदीने ती स्वतःला मारून घेत होती. .पण नक्की काय झालंय हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते. शेवटी एक कारण सापडलं ते म्हणजे घरात सतत होणाऱ्या कुरबुरी. तसं बघायला गेल तर सगळ्यांच्या घरात कुरबुर असतेच भांड्याला भांड हे लागतंच पण तिची ही घालमेल गेल्या सव्वीस वर्षांपासूनची होती. ती आज काही अंशी बाहेर पडलेली. पण ती घरात संवाद साधण्यासाठी सर्वजण असताना देखील शांतपणे स्वतःच्या मनाची समजूत घालून शांत झाली आणि जाऊन वाढेललं ताट घेऊन जेवायला बसली आणि ती मनातली आग तिथेच शमली.
पण हे तिचे रौद्र रूप अचानक बाहेर पडले याचे कारण म्हणजे तिच्या घरची लॉकडाऊनच्या काळातील घरातील हिंसक परिस्थिती. सततची भांडणे, घरातील प्रत्येक स्त्रीच्या चारित्र्यावर घेतला जाणारा संशय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या डोळ्यादेखत आईला सतत झालेली अमानुष मारहाण. या सर्वाला एकत्रितपणे समाजात घरगुती हिंसाचार (Domestic Violence) संबोधले जाते. कायद्यात अनेक तरतुदी यासाठी केल्या आहे पण खरंच ही कायद्याची मदत मिळवण्यासाठी प्रत्येक स्त्री बाहेर पडत असेल का तर नाही मग ती अशी आतल्या आत कुढत राहते परीचीही तीच अवस्था होती.
भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. नेमकी पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे काय असे म्हंटले तर घरातील कर्त्या पुरुषाचे महत्त्व जास्त असणे. सर्व निर्णय पुरुष घेत असतो. परंतु एकविसाव्या शतकात पुरुषप्रधान संस्कृतीच लोण थोडफार कमी झालेले वाटते परंतु संस्कृतीचा पगडा कमी झाला तरी पुरुषाचा अहंकार मात्र अजूनही आहे तसाच आहे. पुरुषाच्या अहंकारावर भाष्य कधी करण्याचा चुकून प्रयत्न जरी स्त्रीने केला तरी तो अजून दुखावतो आणि मग अहंकाराचे रुपांतर पुरुषत्वात होते आणि तेच सिद्ध करण्यासाठी तो बायकोचा वापर करतो. परिणामी अमानुष मारहाण आणि बलात्कार यांसारख्या घटना घडतात. एकूणच काय तर या पुरुषत्वात बळी जातो तो स्त्री चा.
भारतीय दंड विधानाप्रमाणे महिलांना ४९८अ सारख्या कलमान्वये संरक्षण दिले गेले आहे. त्याखाली नवरा आणि त्याचे नातेवाईक ह्यांच्यावर मानसिक, शारीरिक छळ होत असल्याच्या कारणावरून स्त्रीला गुन्हा नोंदवता येतो. काही अत्याचारांचे स्वरूप शारीरिक नसून मानसिक, शाब्दिक असते. मात्र ते शारीरिक त्रासाइतकेच भयानक असतात, असू शकतात. तरीही सामाजिक दडपणामुळे महिलांकडून टोकाचे मार्ग वापरले जात नाहीत. पण कुठेतरी या सर्व घरच्या परिस्थितीचा परिणाम हा घरातील मुलांच्या मनावर होत असतो . या मुलांमध्ये भीती, आत्मविश्वासाची कमतरता हे गंभीर परिणाम दिसून येत असतात. या मुलांना प्रामुख्याने मानसिक आधाराची खूप गरज असते. परंतु घरात एकसारखेच वातावरण जर मुलांच्या वाट्याला आले तर ते मुल आपल्या आयुष्यात कितीही सफल होण्याचा प्रयत्न केला तरीही हे यशस्वी होत नाही हेही तितकेच खरे. परिणामी अशा मुलांना नैराश्याला देखील सामोरे जावे लागते. एवढे होऊनही पाल्याकडे दुर्लक्ष केले जातेच का तर एवढ काय त्यात तुझी आई चुकते म्हणून मी तिला मारतो असे ऐकण्यावाचून त्या मुलाकडे दुसरे काहीही नसते. कालांतराने आई वर असलेली संशयाची सुई ही तिच्या मुलीच्या वाट्याला देखील येते . स्वतःच्या जन्मदात्याकडून वाट्याला येणारी वागणूक पाहून पूर्णपणे खचलेली ती मुलगी मात्र स्वतःला एका कोशात बंदिस्त करून घेत असते.
या सगळ्यातून बाहेर पडण्याचा उपाय काय असा प्रश्न जर तिने उपस्थित केला तर तिच्या समोर एक पर्याय उपलब्ध राहतो तो म्हणजे लग्न पण लग्न करताना पुन्हा एका पुरुषाचा संबंध आलाच तोही तसाच असला तर.....असा विचार करून मात्र निशब्द होऊन जाते पण परिस्थिती मात्र आहे तशीच राहते...
-शामल सावंत

Comments
Post a Comment