आईच्या साडीचा "घागरा"
आईच्या साडीचा "घागरा"
लहानपणापासूनच नाचण्याची मला आवड...त्यातल्या त्यात पण मराठी शाळेत असताना २६ जानेवारी ला गॅदरिंग असायचंच... मग त्याची तयारी महिनाभर आधी सुरु.. कोणत्या गाण्यावर डान्स करायचा...कसा करायचा...कोणी कोणी करायचा... कोणत्या स्टेप करायच्या आणि कधी कुठे गिरकी घ्यायची असं सगळ सगळ...असचं एका वर्षी गॅदरिंग च्या तयारीच्या वेळी सह्याद्री वाहिनीवर दम-दमा-दम हा कार्यक्रम सुरु असताना कुरुक्षेत्र सिनेमातील नही मिलेगा ऐसा घागरा ह्या गाण्यावर डान्स सुरु झाला आणि मला आवडला. आई ला म्हटल मला आता यावरच नाचायचं आहे आई ला सांगण्याचं कारण असं कि मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेची ती मुख्याध्यापिका . त्यामुळे बऱ्यापैकी तीच ठरवायची. पण एवढ होऊन पण माझे नखरे कमी नाहीत मला आता नाचण्यासाठी घागरा पण सिनेमातील त्या गाण्यात हिरोईनने घातलेल्या घागऱ्यासारखाच हवा होता आणि तो पूर्ण शोधून पण मिळाला नाही. पण मुलीचे नखरे पूर्ण करणार नाही ती आई काय....??? आईने तिच्या आवडीची आणि उंची जरीची साडी बाहेर काढली आणि त्याचा तिने स्वतःच्या हाताने घागरा शिवला. तो इतका मस्त झाला कि तालीम पण माझी मी त्यावरच केली. पण हे घागऱ्याचं कौतुक मला त्यावेळी वाटलं नव्हत पण आता जुने फोटो बघताना ते जाणवलं ...आईचं प्रेम आणि वात्सल्य. याला जगात कुठेही तोड नाही.
(फोटोमध्ये माझ्याकडे पडद्याच्या आडून बघणारी माझी आई आहे. शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक वालोटी नं.१ - २००३)

Comments
Post a Comment