गोष्ट माझ्या 'साखरेची'


        

        आयुष्य एकदम मस्त सुरु होतं. सगळं खायचे, प्यायचे सगळं एकदम भारी. सगळं एंजॉय करत करत वयाची तिशी पण पार केली.  आता वयाची तिशी म्हणजे काय? तर खरं सांगायचं तर काहीच नाही. वय वाढतं, अपेक्षा वाढतात, शरीरावरची चरबी वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे माज वाढतो. बाकीच्यांचं माहीत नाही पण मला आहे बाबा माज. पण ज्याचे संतुलन नसेल ते आयुष्य कसले? असं म्हणत म्हणत माझ्या आयुष्यात भरभक्कम एंट्री केली ती मधुमहाने म्हणजे तुमचा आमचा लाडका कोणालाही नको असलेला 'Diabetes'. मासिक पाळीचा सुरुवातीपासून त्रास. वजन वाढत म्हणून पाळी येत नाही आणि पाळी येत नाही म्हणून वजन वाढतं असं साधं सोपं चक्र आरामात सुरु होतं. पण माझ्या गुणी डॉक्टरला आला संशय. आता मुळात मी मुलगी गोड मग वाटलं असावं काळ्या पडलेल्या मानेमागे हिचा रक्तातील गोडवा तर नाही ना? तर अशा प्रकारे मी टाइमपास म्हणून केलेल्या रक्ताच्या तपासणीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक साखर होती बाबा. खरं तर रिपोर्ट आल्यानांतर माझे नाही पण माझ्या घरी असणाऱ्या सावंत डॉक्टरांचे डोळे फिरले. आता सावंतांची लेकच गोड त्याला बिचारी साखर तरी काय करणार? असो. असं सुरु झालं माझं नवीन वर्ष.  

      बरं आता गाडी एवढ्यावर थोडी थांबणार? चला आपण पुढे जाऊया म्हणत मी पुन्हा माझ्या घरी म्हणजे अर्थात मुंबईला आले. ज्यांना समजलं त्यांनी शक्य तितके ताजेतवाने सल्ले दिले.  साखर बंद, चपाती बंद, भात बंद, केक बंद, पेस्ट्री बंद, हे बंद आणि ते बंद. इतकं ऐकल्यानंतर वाटलं की आता कदाचित हे ऐकून टेंशन घेऊन अजून inbuilt साखर वाढणार. म्हंटलं जरा थांबूया. बरं सगळ्यांचा एक प्रश्न जो ऐकून खरं तर उत्तर काय द्यावं हे कळेना. हा प्रश्न म्हणजे, "अरे बापरे!!! कशी काय गं?", आता खरं सांगू तर उत्तर काही नव्हतं. वाढली. माझ्या एकूण तब्येतीकडे बघताच 99.99 % लोक म्हणाले, "कमी खा", "आता खाशील बाहेरचं", "व्यायाम सुरु कर", म्हणजे एकूणच काय तर मी अशी म्हणून मला असं. असो. 

    माफ करा बाबानो... असो. एवढच काय तर लाडक्या बहिणीनेपण तू काय करणार आता? रुटीन कधी स्टार्ट करणार? असं विचारलं. साहजिकच मिश्किलपणे मी उत्तर देत विषय टाळला. त्याचा तिला राग आला आणि चक्क तोंडावर फोन कट. म्हंटलं बापरे...!!!  असो. बहीण आहे. काळजी आहे.  पण या सगळ्यातून एक गोष्ट मला कळली.  मधुमेह हा आजार नाही. ही तुमची जीवनशैली आहे. त्यामुळे शक्य तितक्या प्रेमाने हाताळली की सगळं आपोआप होणारच आहे. "टेंशन घेतल्याने टेंशन वाढते".  त्यामुळे chill राहा. बाकी आता मला माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हेदेखील तितकंच खरं. बाकी  यामागची माझी कारणं काय होती? याबद्दल मला काही समजलं आणि काही असेल तर सांगेनच. (एक सांगेन - थोडा त्रास होतो. पण हा त्रास जास्त वेळ नाही राहत) 

Comments

Popular Posts