सहनशील की हताश ती (?)
नेहमीप्रमाणे आपल्या विचारात गुंतून ती सहज आज कचरा काढत होती आणि एक अचानक ध्यानीमनी नसताना त्याने तिच्या कानशिलात लगावली. ती बावरली ,ओरडली, जीव घाबरला कुठे पळू समजत नव्हत तेच त्याने पुन्हा तिच्या कानाखाली मारली...शिव्यांची लाखोली, डोळ्यात राग , दात ओठ खाऊन तिला मारण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याच्या हातून सुटका व्हावी तिची केविलवाणी धडपड. पूर्ण हताश झालेली फक्त त्याचा ती मार सोसत होती आणि तो फक्त तिला अक्षरशः जनावरासारखा वागवत होता.
हे सगळ घडल्यावर तिला भूतकाळात गेली आणि खरच आपली चूक काय होती याचा ती सातत्याने विचार करू लागली. तिला तिचे खर तर उत्तर आधीचं मिळाले होते पण आता ती कोणाजवळ बोलू शकत नव्हती. २८ वर्षांपूर्वी केलेली चूक वयाच्या ५७ व्या वर्षी पण भोगत होती . एखादी बाई सहनशील असते म्हणतातपण एवढी ? एखादा जीव जन्माला घालताना ती जेवढ्या यातना सहन करते तेवढ्या यातना सहन करणारा एकही जीव या सृष्टीमध्ये अस्तित्वात नाही. पण तिचा संघर्ष एवढ्यावरच का थांबत नाही. आज ती ३ मुलांची आई आणि २ नातवंडांची आजी आहे पण आजही पुढारलेल्या जगात तिचा पतीकडून अनन्वित छळ होतच आहे. तिच्या सकट आज जगभरात अनेक बायका आहेत ज्यांना घरातील पुरुषी अहंकारी आणि विकृत वृत्तीला सामारे जावे लागत आहे. महिलांच्या बाजूने आज अनेक कायदे देखील झाले पण त्याचा खरंच अशा महिलांना त्याचा फायदा होत आहे का ? हा प्रश्न आजही मनाला पडतो आहे. ती आज उच्च पदावर असो वा घरी काम करणारी गृहिणी असो पण शारीरिक आणि मानसिक छळ हा होत आहेच. पण समाज काय म्हणेल या भीतीने आणि आवाज उठवला आणि नवर्याने अजून मारले तर या भीतीने आजही अनेक स्त्रिया गप्प आहेत.
स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण उच्चभ्रू स्तरातील बायका वगळता कोणत्या मध्यमवर्गातील बाईने खरंच पुढे येऊन आवाज उठवला आहे ? १० % स्त्रिया या कदाचित आवाज उठवतील देखील पण पुढे काय ? त्यांना खरंच न्याय मिळतो कि फक्त उठवलेला आवाज हा लाईक्स आणि शेअर करून शांत होतो हे त्याचं त्यांनाच माहित. कारण हे आवाज दाबायला पुरुषांना वेळ लागत नाही.
शारीरिक छळ म्हणजे मारणे , झोडणे ,तिचे केस उपटणे ते अगदी तिला मरेपर्यंत मारणे हे सगळं येतं पण त्या जखमा सुकून देखील जातात पण यासोबत होणारा तिचा मानसिक छळ तो मात्र कोणाला दिसत नाही आणि दाखवत देखील नाही. कालांतराने हा मानसिक छळ तिचं वय वाढेल तसं तिला जास्त त्रास देऊ लागतो. उच्चपदावर कार्यरत असली तरी निर्णय घेताना ती चाचपडते. आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होतो आणि पुन्हा नवरा सांगेल तसचं ती वागत राहते एक चकार शब्द न काढता .....
आता हे सगळ लिहिण्याच कारण म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर अशा गोष्टी होत असतील तर स्वतःकडून जेवढी मदत “तिला” करणं शक्य होईल तेवढी करा. ते त्यांच्या घरचं भांडण आहे असं म्हणून विषय सोडून देऊ नका. स्त्री चा जेवढा जयजयकार करता तेवढा ती स्वतःच्या घरी सुरक्षित आहे कि नाही हे देखील बघा.....
त्यामुळे तरी वयाच्या ५७ व्या वर्षी ती सुखात जगू शकेल

Comments
Post a Comment