मी,पीजी आणि त्या...
२०१९ साली मुंबई सोडून मी पुन्हा एकदा गावची वाट धरली. बाबांना वाटलं कि मी चिपळूणला जाऊन पत्रकारिता करेन. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एका वर्तमानपत्रामध्ये काम सुरु केलं. पण मन मात्र काही रमत नव्हतं. मुंबईमध्ये आधीच चार वर्ष काढल्यामुळे पुन्हा एकदा मन इथेच येण्यासाठी नाचत होतं. कधी येणार ती वेळ असा म्हणत दोन वर्ष कशीबशी काढली आणि तो दिवस उजाडला. मी पुन्हा मुंबईला येणार यावर शिक्कामोर्तब झालं. पण मी इथं येण्यामागे मोलाचा वाटा अर्चना सोंडे व प्रमोद सावंत यांना देईन. ते दोघंही माझ्या आयुष्यात नसते तर मला नाही वाटत मी कधी मुंबईमध्ये येऊ शकलेअसते . दोघांनाही मनापासून धन्यवाद म्हणेन. ते म्हणतात ना एखादी गोष्ट जर मनापासून मागितली तर ती मिळतेच. याचा प्रत्यय मला आला. मी कशी आले? कधी आले? यावर एक वेगळा निबंध लिहावा लागेल. पण मुंबईमध्ये मी येऊन राहिले कुठे आणि कशी हे सांगायला मात्र मला खूप आवडेल. तर मुंबईमध्ये यायचं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे राहण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आवडीचा. आता आवडीचा का? याचं कारण म्हणजे 'पेइंग गेस्ट'. यावर मला लिहायला आणि यामध्ये राहायला मला खूप आवडतं. तर सुरुवात करुया माझी मुंबईमधील 'सेकंड इनिंग'...
जेव्हा मी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी २०१६ पासून असलेली आणि माझ्या आयुष्यातील पाहणीही रुममेट म्हणजे सिल्की. सिल्की व माझं अगदी बहिणीचं नातं निर्माण झालं होतं. आम्ही तब्ब्ल अडीच वर्ष एकत्र राहिलो होतो. पण कामाची ठिकाणं वेगळी म्हणून आम्ही वेगळ्या राहायला लागलो. पण पुन्हा एकदा आम्ही रुममेट्स झालो. भांडुपमध्ये एका आलिशान सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये एकत्र राहायला लागलो. आधीच एकमेकींच्या सर्व सवयी माहीत असल्याने जमवून घ्यायला त्रास झाला नाही. पण हि सोबत आमची केवळ एका महिन्यासाठीच होती. पुन्हा एकदा आम्ही वेगळ्या झालो. वाईट वाटलं. पण सुरुवातीला राहण्याचा प्रवासा सोयीस्कर झाला होताच पण पुन्हा एकदा रुम शोधण्याचा अनोखा कार्यक्रम सुरु झाला. अखेर मला रुम मिळाली. त्याच सोसायटीमध्ये. जेव्हा रुम बघायची होती तेव्हा मी घरी आले होते म्हणून ही जबाबदारी मी सिल्कीवर सोपवली. तिला एक रुम आवडली. मी म्हंटलं तुला आवडली असेल तर कर फायनल. झालं... रुम फायनल केली. ब्रोकरबरोबर भांडून रेंट कमी करून घेतला. पण केवळ एकच महिना या रुम मध्ये राहीन या तत्त्वावर. अखेर मी २ बी ५०५ मध्ये आले आणि सुरु झाला माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ.
भांडुप वेस्ट हा माझा पार्सल डिलिव्हरीचा पत्ता झाला. २bhk फ्लॅट होता. फ्लॅटमध्ये आम्ही चार मुली राहत आहोत असं ब्रोकरने सांगितलं. पण पहिल्या दिवशी मात्र मी एकटीच. अर्थात एकटी असल्याने मला झोप लागत नाही. त्यामुळे 'लुसिफर'चा शेवटचा पूर्ण सिझन एका रात्रीत बघून काढला. सकाळी झोपेतून ११ वाजता उठले. समोर उभी राहिली फ्लॅटमधील पहिली रुममेट. साची नावं तिचं. बनारसची होती. बँकेमध्ये भारी पोस्टवर कामाला. दोन पावलांवर तिचं ऑफिस. त्यामुळे मॅडमचं सगळं निवांत होतं. थोड्या गप्पा झाल्या. तिने काही बनारसच्या तर मी काही महाराष्ट्राच्या गोष्टी सांगितल्या. पण आमची मैत्री वाढण्याला एक कारण म्हणजे आंबा. आंब्यामुळे आमची मैत्री घट्ट झाली असं काही म्हणायला हरकत नाही. मी बनारससमोर आंब्याचं कौतुक करत होते आणि ती कोकणचं. छान मस्त गप्पा गोष्टी झाल्या. म्हंटलं चला...पहिली चांगली निघाली. आता उरल्या दोन...उर्वरित दोन पात्र 'डॉक्टर' आहेत असं साचीने बोलता बोलता मला सांगितलं. त्यामुळे माझी उत्सुकता अजूनच वाढली. म्हंटलं आता बिनधास्त आजारी पडायला हरकत नाही. बाहेरची औषधं वाचली. त्यामुळे मी दोघींचीहि वाट पाहू लागले.
थोड्या दिवसांनंतर दुसरी आली. छोटा पॅकेट बडा धमाका. डॉ.एकता शाह. मी आतल्या रूममध्ये मस्तपैकी बसले होते काम करत. एकता आली तिने डोकावून पाहिलं. खूप गोड गोंडस,गोजिरवाणी होती. एकदम बाहुली. जेमतेम पाच फुट पण नसेल तरीही उत्साह प्रचंड. खूप बोलकी होती. खांद्यावर तरीही असेल एक-दोन किलोचं ओझं तरीही दरवाज्यात उभं राहून अर्धा तास गप्पा मारल्या. एकताबरोबरपण एकदम मस्त मैत्री झाली.चला दुसरीपण मस्त निघाली. आता वाट बघत होते तिसऱ्या रूममेटची. या एकता व साचीबरोबर असताना तिसरीबद्दल खूप ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष भेटायचं होतं आणि शेवटी काही दिवसांनी ती आलीच.डॉ.करुणा बनसोडे हातात छोटा टेबल,चटई आणि खांद्यावर बॅग. सगळा पसरा घेऊन माझ्या समोर येऊन उभी राहिली. स्वभावाने खूप शांत. मॅडम मेडिटेशन करणाऱ्या होत्या हे पहिल्या पांच मिनिटांमध्ये समजलं.मीदेखील आधी विपश्यना केल्यामुळे आमच्या गप्पा खूप छान झाल्या. अजून एक होती अंकिता पण ती नसायची कोणमध्ये.तिघीनी तिच्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही.बहुतेक आवडत नव्हती.पण माझी बोलण्याची सवय त्यामुळे तिच्याबरोबरदेखील मी छान मैत्री करुन घेतली.अशा प्रकारे सगळ्यांबरोबर छान गट्टी जमली.रात्रभर गप्पा,स्कीन केअर रुटीन. कुठे मास्क करून लाव कुठे फिरायलाच जा,कुठे आयस्क्रीम ऑर्डर करुन खा.हे सगळं सुरुच होतं.दिवस खूप छान जात होते. आमची सगळ्यांची छान गट्टी जमली आणि सुरू झाला माझ्यापासून आमचा प्रवास.




Comments
Post a Comment