ती आणि चामडयाचा पट्टा



 वय वर्ष 10 . ती रोज शाळेतून घरी यायची आणि शिकवणीची वेळ झाली की तितका वेळ बागेत जाऊन शुद्धलेखन लिहीत बसायची. असं तिने 10 दिवस केलं. शिकवणीला दांडी. पण म्हणतात खोटं कधी लपत नाही. ते लपलं नाहीच. तिच्या बाबांना समजलं की ही पोरगी काय शिकवणीला जात नाही. बागेत जाऊन आवडीची भेळ खात बसते. जेव्हा कळलं तेव्हा तिला आई ने मारलं. कदाचित बाबांच्या मारापासून वाचावी म्हणून. झालं तिने तिची चूक कबूल केली आणि असं पुन्हा कधी होणार नाही असं संगितलं. 

दुसऱ्या दिवशीपासून शिकवणीला जायच म्हणून तिने तिची डान्स प्रॅक्टिस लवकर उरकली. पण व्हायचा तो उशीर झालाच. ती गेली. बसली. शिकली. शिकवणीमधून बाहेर पडताना तिचे बाबा तिला न्यायला आले होते. ती खुश झाली. बाबांच्या गाडीवर बसून जायला मिळणार म्हणून. ती हसत खेळत बाबांच्या मागे बसून गेली खरी . पण... काहीतरी वेगळच घडलं. जेव्हा तिने घरात पाऊल ठेवलं तेव्हा तिने घरातील कामवालीकडे पाहिलं. ती थोडी विचित्र हसली. बाबांकडे पाहिलं ते तिच्याकडे रागाने बघत होते. समोर गाण्याची तुटलेली कॅसेट होती. बाजूला हिरव्या रंगाची नायलॉनची दोरी. नक्की काय चाललय तिला समजल नाही. तरीही ती बाबांकडे बघून हसली आणि काही कळायच्या आताच सनकन तिच्या कानाखाली बसली. ती सुन्न झाली. डोळ्यासमोर अंधार झाला. तिला तिच्या बाबांनी उठवलं आणि हात पुढे करायला सांगितले. तिला वाटल आता पट्टीने मारणार. ती पळून जाऊ लागली. तिथेच तिच्यावर झडप घालून खाली पाडून तिच्या डोक्यात आणि पोटात लाथा घातल्या. तिला नाही समजल. ज्या बापाने जन्माला घातलं तो बाप तिच्याशी असा काय वागतो. नंतर तिला तिथेच तिचे हात पाय करकचून बांधले. तिला ओढत आणून तिथल्याच बेडच्या पायाला बांधले. आणि लाथांचा मार कमी होता म्हणून की काय.. कमरेला असलेला चामडयाच्या पट्ट्याचा मार तिच्या अंगावर पडू लागला. जस जसा तिच्या किंचाळण्याचा आवाज वाढत होता तसतसा पट्ट्याचा अधिक मार तिच्या अंगावर वेगाने येत होता. शरीराचा चुकून एखादा अवयव त्या पट्ट्यापासून वाचला असेल. हा खेळ साधारण एक  तास सुरू होता. शेवटी तिचे बाबा मारून थकले. कारण तिच्यामध्ये सहन करण्याची सर्व शक्ती मेली होती. तिचे शरीर सुन्न पडले होते. अजून कितीही मारले असते तरीही तिला ते जाणवले नसते इतके. ती रडत पण नव्हती. तिला डोळे उघडता येत नव्हते. तिचा डोळा थोडक्यात बचवला होता त्या लोखंडापासून. झालं... तिचे बाबा मारून आणि ती मार खाऊन शांत झाले होते. तिची आई आली. त्यानंतरची तिची हालत बघून ती हताश झाली. जखमांवर रक्तचंदन उगाळून लावताना तिचा एक एक टिपुस लक्षात राहतो. उठताना बसताना विकलांग झाल्याची भावना समजते. 


हे सर्व आज सांगायचे म्हणजे ही गोष्ट घडून आज 17 वर्ष झाली. तिचे मन आजही त्या जखमांनी विव्हळते. शरीराच्या जखमा भरायला 2 महीने गेले. पण मनाच्या जखमा कदाचित आयुष्यभर तशाच राहतील. तिचा प्रयत्न अजूनही यातून सवरण्याचा आहे. पण त्या जखमांचे वजन जास्तच आहे. पण या जखमा कदाचित तुम्हाला नवीन उमेद देतात. आयुष्य जगताना हा प्रसंग आठवला की यापेक्षा वाइट अजून कायच होऊ शकते असे वाटते. आणि Show Must Go On असं म्हणून ती पुढे चालते. 

Comments

Popular Posts